शाळेची सहल गेली, शिक्षक जेवणासाठी थांबले अन् शिक्षक झाले झिंगाट, जेवणाच्या बिलावरून झाला राडा, भवानीनगरमधील प्रकार


इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे शालेय सहलीदरम्यान मद्यप्राशन करून शिक्षकांनीच राडा केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी शिक्षकच ‘झिंग झिंग झिंगाट’ झाल्याची घटना सहलीच्या प्रवासादरम्यान घडली. भवानीनगर परिसरातील शाळेच्या शिक्षकांचा हा ‘प्रताप’ आहे.

यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रवासादरम्यान एका हॉटेलच्या ठिकाणी दोन्ही बसेस थांबल्या होत्या. सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये उतरल्यानंतर शिक्षकही त्यांच्याबरोबर उतरले.

सगळ्यांचे जेवण आटोपल्यानंतर त्याच हॉटेलमध्ये दुसऱ्या ठिकाणी सर्व शिक्षक जेवणासाठी बसले होते. त्यांनी मद्यप्राशन केल्यामुळे जेवणानंतर बिल कोण भरणार? यामुळे राडा झाला. ‘झिंगाट’ झालेल्या शिक्षकांच्या या कृत्यामुळे विद्यार्थी देखील घाबरले होते.

या सर्व प्रकारामुळे सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. ही सहल सोमवारी पहाटे कोल्हापूर, पावनखिंड, रत्नागिरी, चाफळमधील राममंदिर, चिपळूणकडे गेली होती. यामध्ये एसटी आगाराच्या दोन बसेसचा समावेश होता.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व 80 शालेय विद्यार्थी गेले होते. मात्र, या प्रवासादरम्यान ही घटना घडल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे अनेक पालकांनी संताप व्यक्त केला असून अनेक विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार सांगितला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!