शिष्यवृत्ती परीक्षेचा नियम बदलला, आता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना संधी…

पुणे : महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियमात मोठा बदल केला असून, आता ही परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे.

यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून, यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. पूर्वी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता इयत्ता चौथी आणि सातवीमध्ये होणार आहे.

२०२५-२६ पासून याची अंमलबजावणी होणार असून, चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अनुक्रमे एप्रिल किंवा मे महिन्यातील रविवारी होणार आहे. तर पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात येईल. शासनाने चौथीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ₹५,००० आणि सातवीसाठी ₹७,५०० इतकी शिष्यवृत्ती रक्कम मंजूर केली आहे.

इयत्ता चौथी-पाचवीकरिता प्रत्येकी १६,६९३ तर सातवी-आठवीकरिता प्रत्येकी १६,५८८ शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील. याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेची नावेही बदलण्यात आली असून, आता ती अनुक्रमे “प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा” (चौथी स्तर) आणि “उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा” (सातवी स्तर) म्हणून ओळखली जाणार आहेत.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने १९५४-५५ पासून शिष्यवृत्ती परीक्षा सुरू आहे. २०१५ मध्ये शासन निर्णयानुसार ही परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी करण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने पुन्हा एकदा चौथी आणि सातवी स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
