जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले..
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे थेट आता मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. येत्या २० जानेवारीला मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह मुंबईत येणार असून ते आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अशातच बुधवारी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. या आरक्षणासंदर्भात कोणीतरी आवाज उठवणं हे गरजेचं होतं आणि आता तो आवाज जरांगे पाटील यांनी उठवला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आंतरवाली सराटी या ठिकाणी आलो आहे. त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना मुंबईत होणाऱ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला यावर उत्तर देत ते म्हणाले, प्रत्येकाने रस्त्यावर उतरून ओरडलं पाहिजे असं नसतं. पण त्या मोर्चाला पाठिंबा असणं देखील खूप महत्त्वाच असतं.
त्याचबरोबर, माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन केलं यासाठी शुभेच्छा देण्यास आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आमच्यात अशी कोणती चर्चा झाली नाही. मी फक्त आलो, चहापाणी घेतलं मी काही अभ्यासक नसल्याचेही सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे.