Satish Wagh Murder : मोठी बातमी! सुपारी देऊन शेजाऱ्यानेच सतीश वाघ यांचा काढला काटा, ५ लाख दिले अन् अपहरणानंतर १० मिनिटांतच..

Satish Wagh Murder : आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मामा सतीश वाघ यांचा खून झाला असून यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला होता.
याबाबत हडपसर पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेच्या पथकांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी ८ ते १० संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच काल गुन्हे शाखा युनिट ५ च्या दरोडा व वाहनचोरी पथकाने आव्हाळवाडी (ता. हवेली ) येथून एका आरोपीला ताब्यात घेतले होते.
विधान परिषदेचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 09) घडली आहे. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
वाघ यांची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याचा उलगडा होत नव्हता. अखेर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून चार आरोपींना अटक केली आहे. वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा खुलासा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. Satish Wagh Murder
सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक कारणातून ही हत्या केल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली. त्यासाठी आरोपीनं इतर चार जणांना ५ लाखांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सुपारी देणाऱ्या व्यक्तीचा देखील समावेश आहे. हत्येच्या वेळी कारमध्ये असलेला एक आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सतीश वाघ हत्याप्रकरणी अधिक माहिती देताना अमितेश कुमार यांनी सांगितलं, सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात एकूण पाच आरोपी आहेत. आतापर्यंत पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे. वैयक्तीक कारणातून घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं सुपारी देऊन हत्या केली आहे.
ज्याने सुपारी दिली त्यालाही अटक केली आहे. हत्येच्या वेळी गाडीत असलेला एक आरोपी फरार आहे, पोलीस योग्यप्रकारे तपास करत आहेत, लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला जाईल. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही फुटेज तपासले जातायत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या गाडीला ट्रेस करून हत्येचा उलगडा केला आहे.