सातारा ZP राड्यानंतर पोलीस अधिक्षक वैद्यकीय रजेवर; तुषार जोशी खरंच आजारी की निलंबनाऐवजी सक्तीची विश्रांती?

पुणे: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यानंतर ज्यांच्या नेतृत्वात सातारा पोलिसांनी ही कारवाई केली ते जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी वैद्यकीय रजेवर गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या निलंबन आदेशावर भाजपकडून हरकत घेण्यात आली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वकिली भाषेत हे अधिकार केवळ कार्यकारी मंडळ अर्थात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे आहेत, असे स्पष्ट केले. त्यामुळे दोशी यांचे निलंबन आदेश रद्द होण्याची दाट शक्यता आहे.मात्र आता मागील 4 दिवसांपासून ते रजेवर आहेत. आता ते खरंच आजारी पडल्याने वैद्यकीय रजेवर गेले आहेत की राज्य सरकारकडून त्यांना निलंबनाऐवजी सक्तीच्या विश्रांतीसाठी पाठवले आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेली कथित मतचोरी, पोलिसांच्या मदतीने राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषद इमारतीतूनच अटक करून मतदानापासून वंचित ठेवल्याचा प्रकार आणि मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की राज्यभरात चर्चेत आहे.

दरम्यान या राड्यानंतर सातारा पोलीस प्रशासनावर बरीच टीका झाली. सोमवारी विधानपरिषद आणि विधानसभेतही हा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र तुषार जोशी वैद्यकीय रजेवर असल्याने आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.