Satara : मोठी बातमी! अजिंक्यतारा कारखान्यावर गोळीबार, सुरक्षारक्षक ठार…
Satara सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या रेणुका शुगर्स मिल बगॅस यार्डमध्ये वादावादीच्या कारणातून सुरक्षा रक्षकावर पिस्टलमधून गोळीबार करण्यात आला. यामध्ये सुरक्षारक्षक ठार झाल्याची माहिती आहे.
अंकुश रामकृष्ण शिंदे (रा. भरतगाववाडी, ता. सातारा) यांचा मृत्यू झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, मृत अंकुश शिंदे हे मागील सहा महिन्यांपासून शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यामधील रेणुका शुगर्स मिल बगॅस यार्डमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी वादावादीतून त्यांच्यावर शुभम चव्हाण याने पिस्टलमधून गोळी झाडली. Satara
ही गोळी शिंदे यांच्या छातीत लागली. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, त्यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित शुभम चव्हाण याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.