सोरतापवाडीच्या सरपंचांना राज्यपाल भेटीचा बहुमान! राजभवनावर चहापान सोहळ्यात कार्याचे गौरवउद्गार..!!
उरुळीकांचन : देशात स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी पुणे जिल्ह्यातील साहित्य, संगीत, संस्कृती , उद्योजक तसेच राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुण्यातील राजभवनावर चहापाणासाठी निमंत्रित केले होते.
राजभवनाकडून आलेल्या या निमंत्रणाचा बहुमान हवेली तालुक्यातील स्मार्ट ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या तरुण सरपंच संध्या अमित चौधरी यांना मिळाला. ग्रामस्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा यावेळी रमेश बैस यांनी करुन सरपंच संध्या चौधरी यांची प्रशंसा केली.
राजभवनावर राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १५) ध्वजारोहण झाल्यानंतर प्रथेनुसार चहा पान व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुणे जिल्ह्यातील साहित्य, कला, संगीत, संस्कृती व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना राजभवनाकडून निमंत्रित करण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातील ग्रामस्तरावरील उल्लेखनिय काम करणाऱ्या १० ग्रामपंचायतीच्या सरपंचांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते. हवेली तालुक्यातून सोरतापवाडीच्या सरपंच संध्या चौधरी यांना निमंत्रणाचा बहुमान मिळाला होता. त्यानुसार राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनावर सरपंच संध्या चौधरी यांच्या भेटीत त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी निमंत्रणाचा बहुमान मिळालेल्या सोरतापवाडीच्या सरपंच संध्या चौधरी यांनी अल्पवधीत ग्रामविकासाच्या दृष्टीने अतिशय जलदपणे विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. नागरीकांना शुध्दपाणी पुरवठ्यासाठी आदर पुनावाला स्मार्ट मिशन ग्रुप तर्फे फिल्टर युक्त पाणी पुरवठा,जलजीवन मिशन योजनेसाठी जागेचा प्रस्ताव मंजूर करुन ६५ कोटींची प्रस्तावित योजना, सिमेंट रस्ते, ट्रेट लाईट योजना, बंदिस्त गटार योजना, शाळा ,अंगणवाडी साहित्य ,शासकीय लाभार्थी योजनांचा नागरीकांना लाभ , महिलांसाठी कार्यशाळा इ. कामांना गती देऊन प्रगतीपथावर आणण्याची कामगिरी केली आहे.या कामांची दखल शासनाकडून अनेक वेळा घेतल्याने सरपंच संध्या चौधरी यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
चहापानाला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, एमआयटी विश्व शांती केंद्राचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड, अस्थिविकार तज्ज्ञ डॉ के एच संचेती, ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, गायक शौनक अभिषेकी, सलील कुलकर्णी, सावनी शेंडे व आर्या आंबेकर यांसह विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.
राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व पालक मंत्री यांनी निमंत्रितांचे स्वागत केलै.