संतोष जगताप खून प्रकरणातील साक्षीदारांचा सुपारी देऊन ‘गेम ‘ वाजविण्याचा कट उघड ; उरुळी कांचन येथे चौघे गावठी पिस्तुलासह अटकेत ; खूनांचे कारस्थान उघडल्याने परिसर हादरला…!
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता.हवेली ) येथे झालेल्या वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्या खुनातील मुख्य साक्षीदारांना संपविण्याचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी ४ सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्तुलासह अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आशिष अनिल वरगडे (वय-२२ रा. आश्रमरोड, उरुळीकांचन), उध्दव राजाराम मिसाळ (वय-४५ रा. दत्तवाडी, उरुळीकांचन), सुरज सतिष जगताप रा. गणेशवाडी, वरवंड, ता. दौंड) किशोर ऊर्फ शिवा छबु साळुंके रा. बोरीपार्थी, केडगाव, ता. दौंड अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल सोनाईच्या समोर ऑक्टोंबर २०२१ मध्ये संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक यांचा खुन भर रस्त्यामध्ये गोळीबार करुन करण्यात आला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोरील गोळीबारामध्ये तीघांचा जिव गेला होता. त्यानुसार आरोपींवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील अनेक साक्षीदारांपैकी महत्वाचे साक्षीदारांना संपविण्याचा कट संतोष जगताप खुन खटल्यातील मुख्य आरोपींनी शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आल्यानंतर त्यांचे जवळचे मित्रांना (रेकॉर्डवरील गुन्हेगारांना) काही लाख रुपयांची सुपारी देऊन रचला होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या अनुशंघाने लोणी काळभोर पोलीस शनिवारी (ता. २८) गस्त घालीत असताना पोलीस शिपाई निखील पवार यांना एका खबऱ्याकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार व वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार दत्तवाडी रोड, सरकारी दवाखान्याजवळ उरुळी कांचन याठिकाणी सापळा रचुन अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व तिक्ष्ण हत्यारासह दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींचे अंगझडतीमध्ये त्यांचेकडुन एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस एक धारदार चाकू अशी घातक हत्यारे जप्त करणेत आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली असून त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने ४ दिवसांची रिमांड कोठडी दिली आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये वरिल हकिकत निष्पन्न झाली आहे. गुन्हयाचे तपासामध्ये यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे.