मस्साजोगच्या सरपंचपदी संतोष देशमुखांच्या पत्नीची वर्णी लागणार; गावकऱ्यांची लवकरच बैठक होणार?

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता मस्साजोग गावच्या सरपंचपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरच गावकऱ्यांनी आता देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांना पुन्हा निवडणुकीसाठी गळ घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत लवकरच गावातील प्रतिष्ठित लोकांची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे आता मस्साजोगच्या सरपंचपदी अश्विनी संतोष देशमुख यांची वर्णी लागणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दीड वर्षांपूर्वी केज तालुक्यातील मसाजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. त्यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे सरपंच पद रिक्त होते. यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून येत्या 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सरपंच पदाची धुराचा देशमुखांच्या कुटुंबीयांत जावी असा आग्रह गावकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान अश्विनी देशमुख यांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित लोक लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत अश्विनी देशमुख यांना पुन्हा सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख यांनी आपल्या सरपंचपदाच्या काळात जलसंधारण वृक्षारोपणासारखी अनेक सामाजिक विकास कामे केली होती.. याच कार्यकर्त्यांकडून अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला जाणार आहे.

गेल्या वर्षभरात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तुरुंगात असलेल्या मुख्य आरोपी वाल्मीक कराड व इतरांच्या समर्थकांकडून देशमुख कुटुंबांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे देशमुख कुटुंब पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरणार की मग राजकारणापासून अलिप्त राहणार? हे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.