लाडक्या बहिणींना संक्रांतीच मोठं गिफ्ट ; बँक खात्यात जमा होणार 3000 रुपये, समोर आली तारीख

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना राज्य सरकार मकर संक्रांतीची भेट देण्याच्या तयारीत आहे. आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त मोठं गिफ्ट मिळणार आहे. सणाआधीच खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत.येत्या १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याने बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना ‘देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट!’ असे पोस्टर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सत्ताधारी पक्षांतील उमेदवारांनी लाडकी बहीण योजनेचे ‘लाभार्थी’ होण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
येत्या १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रात गोड होणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आहे. तर, महायुतीतील दोन घटकपक्षांच्या उमेदवारांकडून त्यांच्या समाजमाध्यमांच्या अकाऊंटवरून येत्या १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान. सरकारकडून मकरसंक्रातींच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर या घटनेमुळे नेमकी कोणावर ‘संक्रात’ येणार अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.