Sanjeev Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना आज घेणार भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ, राष्ट्रपती भवनात होणार कार्यक्रम…

Sanjeev Khanna : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आता भारताचे ५१ वे सरन्यायाधीश बनणार आहेत. राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश म्हणून शपथ देतील. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली जात आहे.

डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमुर्ती खन्ना हे सर्वात सिनिअऱ होते. त्यामुळे त्यांना नवीन सरन्यायाधीश बनण्याचा बहुमान मिळाला आहे. ते १३ मे २०२५ पर्यंत सरन्यायाधीश म्हणून कार्यरत राहणार आहेत. अर्थात त्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाल सहा महिन्यांचा असणार आहे. Sanjeev Khanna


न्यायमूर्ती संजीव खन्ना, जे दिल्लीतील प्रतिष्ठित घराण्यातील आहेत, ते तिसऱ्या पिढीतील वकील आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी १९८३ मध्ये तीस हजारी न्यायालयात वकिली सुरू केली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिसही केली असून, आता पुढील सहा महिने ते देशाच्या मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
२०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात बढती…
कॉलेजियमच्या शिफारशीनुसार, १८ जानेवारी २०१९ रोजी न्यायमूर्ती खन्ना यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर ते १७ जून २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष होते. सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आहेत. पुढील वर्षी १३ मे रोजी ते निवृत्त होणार आहेत.
