संजय शिरसाट अडचणीत!खात्यातील गैरव्यवहाराबाबत मनसेची थेट फडणवीसांकडे तक्रार, मुख्यमंत्री दखल घेणार?


मुंबई : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गेल्या वर्षभरात विविध कारणावरून आरोप करण्यात आले.जमिन व्यवहार, आर्थिक अनियमीतता तसेच वैयक्तिक वाद अशा अनेक मुद्द्यावरून विरोधकांनी शिरसाट यांच्यावर टीका करत चौकशीची मागणी केली.अशातच सिडकोतील जमीनीच्या गैरव्यवहार प्रकरणावरून ते अडचणीत येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी,सिडकोतील जमिनीच्या गैरव्यवहारावरून मुंबईत मोर्चा काढला, पुरावे म्हणून फायलींचे गठ्ठेच्या गठ्ठे दिले. पण तरी शिरसाट यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही संजय शिरसाट यांच्या खात्यात अनियमितता, गैरव्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता मुख्यमंत्री या प्रकरणाची दखल घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहत सामाजिक न्याय विभागातील अनियमितता , प्रशासकीय घोटाळा, निधी वाटप , संशयास्पद निविदा प्रक्रिया व त्यांच्या कार्यालयातील काही अधिकार्‍यांच्या कामकाजावर गंभीर आरोप करत तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव भरत कदम यांच्यावरही जाधव यांनी आपल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. या शिवाय शिरसाट यांचे ओएसडी म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा संशय जाधव यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री या प्रकरणाची सखोल चौकशी करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मंत्री शिरसाट यांच्या कार्यालयाचा वापर करून काही कामे देताना आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींना टक्केवारीची मागणी केली जात असल्याचा आरोपही जाधव यांनी आपल्या पत्रात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल चौकशी करावी, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!