राज- उद्धव ठाकरेंच्या युतीवर संजय राऊतांच मोठं भाष्य; म्हणाले, दोन्ही ठाकरे…


मुंबई : राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून १५ तारखेला मतदान आणि १६ तारखेला निकाल लागणार आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण तापले असतानाच ठाकरे घराण्याच्या ऐतिहासिक युतीने मोठा राजकीय संदेश दिला आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले असून त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती जाहीर केली आहे.

भाजपाविरोधात एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका या दोन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले असताना शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या दृश्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. संजय राऊत यांनी या प्रसंगाला ऐतिहासिक क्षण म्हणत मराठी एकतेचे प्रतीक म्हणून त्याचे वर्णन केले. त्यांनी सांगितले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असून हा क्षण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा आहे.

       

संजय राऊत म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला, तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता. आजही राज आणि उद्धव हे मराठी एकतेचा मंगल कलश घेऊन आले आहेत. हा मंगल कलश मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे उभा राहील, असे ठाम मत त्यांनी मांडले.

संजय राऊत यांनी एक दिवस आधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते. सर्वकाही नियोजित असून जागावाटपाबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज अधिकृतपणे महापालिका निवडणुकांसाठी महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. या युतीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!