संजय राऊतांनी हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे, भाजपचे नवनाथ बन यांचे टीकास्त्र…


पुणे : वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. उद्धव ठाकरेंनी अजान स्पर्धा, नमाज पठण स्पर्धेचे आयोजन केले, मुंबईत मराठी भवन बाजूला उर्दू भवन निर्मिती करणे, राशिद मामूला पक्षात प्रवेश दिला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

मतांसाठी इतकी लाचारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी आता हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठी माणसाला बेदम मारहाण करणे, खिचडी घोटाळ्यासारखे असंख्य घोटाळे करणे, पत्रा चाळ घोटाळा करून मराठी माणसाला बेघर करणे हे राऊतांचे हिंदुत्व आहे का असा प्रहारही बन यांनी केला.

यावेळी बन म्हणाले की, भाजपाचे हिंदुत्व हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदुत्वाचा गजर आणि त्यासोबतच विकास या धोरणानुसार काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने राम मंदिर बांधले, 370 कलम हटवून दाखवले. सामान्य माणसाला हिंदुत्वाचे रक्षण कोण करत आहे हे चांगलेच ठाऊक आहे.

       

नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुका यांच्या निकालानंतर संजय राऊत यांनी पराभवाच्या भीतीतून रोज उठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर तथ्यहीन आरोप करणे सुरू केले असून त्यांच्या अस्वस्थतेचा हा स्पष्ट पुरावा आहे अशी बोचरी टीकाही श्री. बन यांनी केली. भाजपासोबत युतीत असलेले लोकंच भाजपाचा पराभव करण्यास इच्छुक असल्याचे बिनबुडाचे वक्तव्य करणा-या राऊतांना लक्ष्य करत बन यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले.

नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी उबाठा गटाचे पानीपत केले आहे. याच निवडणुकीत भाजपा आणि संपूर्ण महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठीशी राज्यातील 14 कोटी जनतेचे कायम आशीर्वाद आहेत. कोणी कितीही बाष्कळ आरोप केले तरी मुंबईचा विकास फडणवीस आणि महायुती सरकारच करू शकते हा विश्वास जनतेला असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा, महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!