अखेर ठरलं! भीमा पाटस कारखान्याप्रकरणी संजय राऊत यांची 26 एप्रिलला दौंडला होणार सभा.

पाटस : गेल्या महिन्यात मुंबई येथे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दौंडमधील भीमा-पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

याबाबत मी कागदपत्रे देतो, मला वेळ द्या, अशी लेखी मागणी खा. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्यांच्याकडून खा. राऊत यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, त्यांनी सीबीआयकडे तक्रार करण्याचे म्हटले होते.

याबाबत संजय राऊत यांची दौंड येथे 26 एप्रिल रोजी सभा होणार आहे. भीमा-पाटस साखर कारखान्याच्या 500 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारावर या सभेत राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत माजी आमदार रमेश थोरात, महानंदा दूध संघाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी खा. राऊत यांची त्यांच्या कार्यालयात मुंबई येथे भेट घेतली होती.
तालुक्यात कुल यांच्या समर्थकांनी राऊत यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले होते. हा सर्व गोंधळ पाहून थोरात यांच्या समर्थकांची खा. राऊत यांची सभा झाली पाहिजे, अशी इच्छा होती. आता या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.