मोठी बातमी ! मनसेचे संदिप देशपांडे यांच्यावर हल्लाप्रकरणी दोघे ताब्यात ! हल्लाची चौकशी सुरू…!

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मला मारहाण करताना हल्लेखोरांनी ठाकरे व वरुण सरदेसाईंचे नाव घेतले, असे फिर्यादीत संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यातून दोन हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी लावला आहे .दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी शिवाजी पार्क येथे हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोन जणांना अटक केली आहे. तसेच, तपासासाठी विशेष पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे.
हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरची कॉपीही समोर आली आहे. मारहाण करताना हल्लेखोरांनी ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. आज संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते कोणता गौप्यस्फोट करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.