Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या अडचणीत मोठी वाढ! आता ईडीने केला गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

Sameer Wankhede : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे अमली पदार्थाविरोधात कारवाई करून चर्चेत आले होते. सिनेअभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ रोजी अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केल्यापासून समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत होते. आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहे.
समीर वानखेडे यांच्यावर कार्डेलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप यापूर्वी झाला आहे. इतकेच नाही तर त्यांच्यावर मागील वर्षी मे महिन्यात सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. त्याआधारे ईडीने आपला गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
सीबीआय ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या धरतीवर ईडी ने ECIR दाखल केला आहे. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरोधात कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी भ्रष्टाचाराचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती.
कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार के पी गोसावी आणि त्याचा साथीदार सनवेल डिसूजा यांनी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून आर्यनला मदत करण्यासाठी १८ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि ५० लाख रुपये घेतल्याचा करण्यात आला आहे. घेतलेले ५० लाख रुपये नंतर परत केल्याचे देखील एफ आय आर मध्ये नमूद करण्यात आले आहे. Sameer Wankhede
दरम्यान, समीर वानखेडे यांची सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी याआधीच चौकशी केली आहे. पण समीर वानखेडे यांनी सीबीआयचे आरोप फेटाळून लावले होते. काही एनसीबी अधिकाऱ्यांकडून आपल्यावर खोटा आळ टाकला जात आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला. ईडीने वानखेडे यांच्याविरोधात PMLA कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.