संभाजीनगर हादरलं!! मध्यरात्री गोळीबाराचा थरार, अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काऊंटर, अंगावर गाडी घातली अन्…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री थरारक घटना घडली. शहराच्या वडगाव कोल्हाटी भागात पोलिस आणि एका कुख्यात दरोडेखोरामध्ये धुमश्चक्री उडाली. पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करताच आरोपी अमोल खोतकर याचा जागीच एन्काऊंटर झाला.

हा एन्काऊंटर राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ७ मे रोजी संभाजीनगरमधील बजाजनगर भागातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी मोठा दरोडा पडला होता. कुटुंब अमेरिकेला गेले असताना १५ मे रोजी पहाटेच्या सुमारास ६ दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत साडेपाच किलो सोने आणि ३२ किलो चांदी असा ६ कोटींचा ऐवज लंपास केला होता.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराचा एन्काऊंटर करण्यात आला. वाळूज परिसरातील कोल्हाटी भागात अमोल खोतकर हा असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सह-पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथे गेले.

पोलिसांचे पथक याठिकाणी पोहोचले तेव्हा अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना पाहताच त्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. अमोल खोतकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पोलिसांवर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार सुरु केला.
दरम्यान, पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या एन्काऊंटरबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत. हा एन्काऊंटर कसा झाला, याची कोणतीही माहिती आणि तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिलेला आहे.
अलीकडेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंका बोलून दाखवली होती. त्यानंतर आता अमोल खोतकरचा एन्काऊंटर झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली जाणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.