समर्थ क्रॉप केअर व शिवराज्य अर्बन निधी लिमिटेडची मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार, दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून हजारो कोटींची गुंतवणूक; प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष…


लोणी काळभोर : सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, उद्योजक तसेच महिलावर्गाला दहा महिन्यात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून हजारो कोटींची रक्कम हडपसर येथील समर्थ क्रॉप केअर व शिवराज्य अर्बन निधी लिमिटेड या कंपन्यांनी जमा केली आहे. या संस्थांच्या जादा परतावा देण्याच्या कारभाराबाबत भाजपचे सोशल मिडियाचे पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे लेखी स्वरुपात तक्रार केली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या संचालकांवर प्रशासन आता काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हडपसर येथील समर्थ क्रॉप केअर व शिवराज्य अर्बन निधी लिमिटेड या बोगस संस्थांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मानसिकता लक्षात घेऊन अल्पावधीत दामदुप्पट व प्रतिमाह ५ हे १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले आहे. समर्थ क्रॉप केअरने शेतकऱ्यांना दहा महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचा दावा केला आहे. तर शिवराज्य अर्बन निधी लिमिटेडने बचत ठेव योजनेच्या माध्यमातून प्रतिमाह गुंतवणूक केल्यास तीन वर्षात दुप्पट आणि प्रतिमाह ५ टक्के परतावा देण्याचे एका परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. कमी गुंतवणूकीत जास्त फायदा होईल याला बळी पडून महाराष्ट्रातील लाखो शेतक-यांनी या फसव्या योजनेत हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे.

या दोन्ही कंपन्यांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी कमिशनचे लालूच दाखवून एजंट लोकांच्या नियुक्या केल्या आहे. या एजंटांनी नवनवीन फंडे वापरून या बोगस योजनांची राज्यभर जाहिरात केल्याने या मार्केटिंग भूलभुलैय्यामध्ये फसून लाखो गुंतवणूकदारांनी हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक यामध्ये केली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या कोणत्याही योजना अधिकृत नसून कधीही बंद पडू शकतात. त्यामुळे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आर्थिक फसवणुकीचा घोटाळा उघड होऊ शकतो.

यापुर्वी याप्रकारच्या फसवणूकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तळेगाव-ढमढेरे येथील बोगस शेअर घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार नितीन नरके प्रकरण, बार्शी येथील ‘फटे स्कॅम’ प्रकरण, त्यातच अलीकडील प्रकरण म्हणजे श्रींगोंदा तालुक्यातील इन्फिनिटी बिकन प्रकरण होय. यामध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची ५०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

यासंदर्भात माहिती देताना जनार्दन दांडगे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अगोदरच पिचला आहे आणि यात फसवणूक झाल्यास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या संस्थांच्या योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी वैयक्तिक कर्ज काढून लोभापोटी हजारो कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली आहे. परंतु, दोन्ही कंपन्याचे संचालक आर्थिक घोटाळा करून पळून शेतकऱ्यांची फसवणूक करू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ईडी व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपन्यांचा भांडाफोड करून संबंधित ठगांवर कारवाई करावी.

संबंधित कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून करोडो रुपयांची गुंतवणूक करून घेतली आहे. परंतु हा पैसा जातो कुठे? अथवा या पैशाचे काय केले जाते? याचा अद्यापपर्यंत कुणालाही थांगपत्ता लागलेला नाही. परंतु, कंपनीच्या संचालकांची मात्र संपत्ती १ हजार कोटींहून अधिक रुपयांची झालेली आहे. परंतु, हा एक फसवणुकीचा स्कॅम असून संचालक पैसे गुंडाळून कधीही गायब होऊ शकतात. त्यामुळे संबंधितावर कारवाई कधी होणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

जनार्दन दांडगे (जिल्हाध्यक्ष – भाजप सोशल मीडिया पुणे, (उत्तर) – “नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अगोदरच पिचला आहे. आणि यात फसवणूक झाल्यास, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. वरील दोन्ही संस्थांच्या योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी वैयक्तिक कर्ज काढून, नातेवाईक , मित्रांकडून पैसे घेऊन आर्थिक लोभापोटी हजारो कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली आहे. परंतु, दोन्ही कंपन्या आर्थिक अडचणीत आल्यास, अथवा संचालक मंडळाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास पुणे, नगर, सोलापूरसह दहा जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक शेतकरी अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ईडी व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून, यात चुकीचे आढळल्यास करादेशीर कारवाई करावी अशी विनंती आहे.”

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!