वढू ब्रूद्रुक येथे शंभूराजेंना अभिवादन, समाधीवर महाभिषेक, हजारो शंभूभक्त दाखल.
वढू बुद्रुक : येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 334 व्या बलिदान स्मरणदिनी हजारो शंभूभक्तांनी छत्रपती श्री संभाजी महाराज यांना आदरांजली वाहिली. यावेळी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय’ या घोषणांनी कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी हजारो भाविकांनी मूक पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अंकित गोयल व प्रांताधिकारी स्नेहल देवकाते, घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली.
सकाळी सहा वाजता शंभू महाराज, कवी कलश व वीर शिवले यांच्या समाधीवर महाभिषेक करण्यात आला. शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या कीर्तनामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास शंभू भक्तांसमोर मांडत त्यांनी धर्मासाठी केलेले बलिदान व स्वराज्यासाठी केलेले कार्य यावर प्रकाश टाकत शंभू महाराजांना अभिवादन केले.
शंभू भक्तांसाठी श्री धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा मंच, कृती समिती वढू बुद्रुक व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी गृहविभागातर्फे रायफलच्या फायरिंगद्वारे महाराजांना शासकीय सलामी देण्यात आली. पुरंदरवरून आलेल्या पालखीचे स्वागत ग्रामस्थांनी केले.