जरांगेंच्या आंदोलनातून दु:खद बातमी! जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू..


मुंबईत : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक मुंबईकडे रवाना झाले असतानाच जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मृत आंदोलकाचे नाव सतीश देशमुख असे असून, या घटनेमुळे मराठा समाजात हळहळ व्यक्त होत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मोर्चा सुरू केला होता. आज सकाळी ते शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. याचवेळी सतीश देशमुख यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणापूर्वीच ही दुर्घटना घडल्याने वातावरणात शोककळा पसरली आहे.

सतीश देशमुखांच्या मृत्यूनंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे.

परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 8 तासांची वेळ दिली. पोलिसांना हमी देत जरांगेंनी ही वेळ मान्यही केलीये. मात्र शिवनेरीत पोहोचल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळीच भूमिका घेणार की काय असं दिसून आलं.

त्यामुळे मनोज जरांगे आणि मराठा बांधव आता प्रशासनानं दिलेली 8 तासांची वेळ पाळणार की वेळेवर आणखी कोणती वेगळी भूमिका घेणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच अटीशर्ती काढा अशी मागणी मनोज जरांगेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!