फुकटात साड्या मिळवण्यासाठी महिलांची चेंगराचेंगरी ; चौघींनी गमावला जीव…!

चेन्नई : तामिळनाडू येथील वानियाम्बादी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अचानक चेंगराचेंगरी होऊन चार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, काही महिला जखमी झाल्या आहेत.
थैपूयम येथील एका खासगी संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत होते. याचवेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साड्या मिळवण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती आणि अनेक महिलांनी व्यासपीठाकडे धाव घेतली त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
कार्यक्रमासाठी जवळपास १००० महिला आल्या होत्या. याचवेळी अचानक घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेकींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्येही काहींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, दोषींवर कायद्यानुसार कारवाई होईल. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती तरीही कार्यक्रम कसा झाला, याचा तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, थाईपुसम हा एक सण असून हिंदू तमिळ समजाकडून या महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. याच उत्सवासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याचवेळी ही दुर्घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी वानियाम्बडी दुर्घटनेत प्राण गमावणा-या महिलांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.