पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून मागितली ‘तीन कोटी रुपयांची’ खंडणी ! दोघांविरोधात गुन्हा दाखल…!
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. एका बांधकाम व्यवसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पौड रस्त्यावर या बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी संबंधित बांधकाम व्यवसायिकाच्या मोबाईलवर संपर्क साधला. मुरलीधर मोहोळ यांच्या मावस भावाच्या नावाचा वापर करुन खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली आहे.
आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे तपास करत आहेत.