भोंदू बाबाचं प्रकरण नडलं! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा…

मुंबई : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

याआधीच चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे आपला राजीनामा सादर केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर आपल्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, खरात प्रकरणाबाबत पहिल्याच दिवशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि त्या भूमिकेत आजही कोणताही बदल झालेला नाही.

खरात यांच्या आर्थिक व्यवहारांशी किंवा कथित गैरकृत्यांशी आपला कोणताही दूरान्वये संबंध नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यातून सर्व सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच, कोणताही ठोस पुरावा नसताना माध्यमांमधून होत असलेले आरोप वेदनादायक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शेवटी सत्य प्रखरतेने सिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावा, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री आणि मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे केली होती.
तसेच, आज सकाळी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशोक खरात सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात असून त्याच्यावर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणाचा सध्या एसआयटीकडून सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमध्ये त्या अशोक खरात यांची पाद्यपूजा करत असल्याचे दिसत होते, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही त्यांच्यावर टीका सुरूच होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.