रूपाली चाकणकरांना डच्चू! महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवारांनी सुचवली 4 नाव, कोणाची वर्णी?

पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर रूपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता पुढचा अध्यक्ष कोण?अशी चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चार नावे सुचवली आहेत. यामध्ये आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा नवा चेहरा कोण असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी महिला आयोगाच्या निवडीवरून सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला आहे. त्यासोबतच त्यांनी या ट्वीटमध्ये चार अनुभवी नावंही सुचवली आहेत. दरम्यान आता रोहित पवार यांनी सुचवलेल्या या नावांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किती विचार करतात की महायुतीकडून एखाद्या नवीन राजकीय चेहऱ्याला संधी दिली जाते, हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार रोहित पवारांनी सुचवलेली चार नावे कोणती?

1. मीरा बोरवणकर: निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी – त्यांच्या निर्भीड आणि निष्पक्ष कार्यशैलीसाठी त्या ओळखल्या जातात.
2. ॲड. वर्षा देशपांडे: सामाजिक कार्यकर्त्या – स्त्री-भ्रूणहत्या आणि महिलांच्या हक्कांसाठी त्यांचे मोठे काम आहे.
3. मनीषा गुप्ते: ‘मासूम’ संस्थेच्या माध्यमातून आरोग्य आणि महिला हक्कांसाठी कार्यरत.
4. मेधा गाडगीळ: निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी – प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव.
दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नावे सुचवताना रोहित पवारांनी जोरदार टोला देखील लगावला आहे.केवळ राजकीय सोयीसाठी नियुक्त्या करण्यापेक्षा महिलांच्या प्रश्नांची जाण असलेल्या आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती होणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.