पुण्यात मतदानाच्या पूर्वसंध्येला राडा; अजित पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवारांच्या पतीवर जीवघेणा हल्ला

पुणे : पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजताना मतदाना सुरूवात झाली आहे. मात्र मतदानच्या पूर्वसंध्येलाच पुण्यातील खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामुळे राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या नवऱ्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शरद बुट्टे पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बुट्टे पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.
माझी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी काही दिवसापूर्वीच भाजपातून अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या हल्ल्यात बुट्टे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.शरद बुट्टे हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.जुन्या वादातून किंवा राजकीय कारणातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद निवडणूक काळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.