Rohit Pawar ED Inqury : आजोबांचा आशीर्वाद, आत्याची साथ, रोहित पवार ईडीच्या चौकशीसाठी दाखल, आज नेमकं काय होणार?
Rohit Pawar ED Inqury : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते कार्यलयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. साधारणतः सकाळी साडेदहा वाजता रोहित पवार ईडी कार्यालयात पोहोचले.
चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी यापूर्वीच दिली होती. तसेच, कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिला होता. तसेच, ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.
आमदार रोहित पवार यांची आज मुंबईत ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवार ट्रायडन्ट हॉटेलवरुन निघाल्यापासून ईडी कार्यालयात दाखल होईपर्यंत त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते होते. चौकशीसाठी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी सर्वात आधी रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले.
रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर मुंबईतील पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला आलेल्या. दरम्यान, ईडी चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. Rohit Pawar ED Inqury
रोहित पवार हे एकटे नाहीत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. जामखेड, बारामती, पुणे येथून हजारो कार्यकर्ते काल रात्रीपासन मुंबईत दाखल असून त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ विविध घोषणा दिल्या.’एकच वादा रोहित दादा’ अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी रोहित पवरा यांना पाठिंबा दर्शवला.
एवढेच नव्हे तर बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांसाठी बॅनर लावण्यात आले. ‘पळणारा नाही तर लढणारा दादा ‘ असे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले. तसेच ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असे लिहिलेले बॅनरही लावण्यात आले आहे.