पती अटकेत, महिला आयोगाची एन्ट्री होताचं रोहिणी खडसे संतापल्या…

पुणे : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. खेवलकरसोबत या प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. मात्र, खेवलकरच्या वकिलांनी अजूनही कोर्टात जामिनासाठी अर्ज केला नाही. आता या प्रकरणात महिला आयोगाने उडी घेतली. त्यामुळे पत्नी रोहिणी खडसे या संतापल्या असून त्यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले आहे. मुद्दा क्र. 1 ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.
राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले आहेत. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले? इतके कसे कार्यतत्पर झाले? आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे, असे रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.