भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या आदेशाला रिव्हरवह्यू सिटीकडून केराची टोपली ! काम बंद ठेवण्याचे आदेश मात्र सेवा रस्त्यातील पाईललाईनचे काम सुरु.

लोणी काळभोर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने काम बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही रिव्हरव्ह्यू सिटीने पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यातील पाण्याच्या पाईललाईनचे काम शनिवारीही सुरु ठेवले आहे. यांमुळे रिव्हरव्ह्यू सिटी प्रशासनाने प्राधिकरणाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून एक प्रकारे प्रशासनालाच आव्हान दिल्याचे निदर्शनास येत आहे

कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ च्या सेवा रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने रिव्हर व्हयू सिटी पुणे यांना काम करण्यासाठी परवानगी दिली होती. रिव्हर व्हयू सिटी काम करीत असतांना ठरवून दिलेल्या नियमानुसार पाईपलाईनचे काम केलेले नाही. त्यामुळे सेवा रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन तरुण जखमी झाले होते. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने काम बंद करण्याचे आदेश दिले होते.
सदर पाईप लाईनसाठी दिलेली परवानगी तात्पूरती रद्द करण्यात आली असून त्यांच्याकडून अनुपालन अहवाल मागविण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल दंड देखील करण्यात आला आहे. शासकीय नियमबाह्य काम करून सेवा रस्ता पूर्वव्रत न केल्यामुळे खोदकाम करणाऱ्यांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने एका परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले आहेत.
वारजे येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी सेवा रस्ता खोदण्याचे काम दिले आहे का? असा जाब विचात कार्यालयात गोंधळ घातला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. आणि त्यांच्या अर्जाची दखल घेऊन काम बंद करण्याचे त्वरित आदेश दिले आहेत.

रिव्हर व्हयू सिटीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिलेले आदेश पायदळी तुडवून पुन्हा पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर काम करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शासनाने आदेश जुगारणाऱ्यांवर रिव्हर प्रशासन काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चित्तरंजन गायकवाड (माजी सरपंच कदमवाकवस्ती) सेवा रस्ता खोदुन सुरु असलेले पाईललाईनचे काम अनधिकृत आहे. काम बंद करण्याचे आदेश असूनही काम सुरू आहे. रिव्हर व्हयू सिटी प्रशासनाने कायदा धाब्यावर बसवला आहे. खोदकामांमुळे नागरिकांना विरुद्ध दिशेने धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर एखादा असा प्रकार घडला तर याला रिव्हर व्हयू सिटी प्रशासन जबाबदार असणार आहे.