पुण्यातील निवृत्त अधिकाऱ्याला 4 कोटींचा गंडा ; RAW चा एजेंट अन मंत्री शहांनी कॉन्फरन्स कॉल केल्याचा देखावा…

पुणे : पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निवृत्त अधिकाऱ्याला 4 कोटींचा गंडा लागला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने रॉ गुप्तचर यंत्रणेचा एजंट असल्याचं भासवून गेल्या पाच वर्षापासून त्या निवृत्त बँक अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून पर्वती पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीनं तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘कॉन्फरन्स कॉल’ केल्याचा देखावा केला. तसेच इतरही बनावट अधिकारी उभे केले.आपण रॉच्या मिशनवर आहोत. आपल्याला ३८ कोटी रुपये मिळणार आहेत. हे पैसे मिळवण्यासाठी प्रोसेस फी भरावी लागणार आहे, अशी विविध कारणं सांगून आरोपीनं फसवणूक केली आहे.
या फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदार अधिकाऱ्याचेच काही नातेवाईक सहभागी असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शुभम सुनील प्रभाळे, सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे या पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हा सगळा प्रकार २०१९ पासून सुरू होता. फिर्यादी यांच्या मेहुण्याने शुभम गुप्तचर खात्यात कार्यरत आहे. त्याने एक मिशन पूर्ण केले असून त्याला ३८ कोटींचे बक्षीस मिळणार आहे, अशी बतावणी केली. मात्र हे बक्षीस मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी, वकिलांची फी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवस्तू देणे गरजेचे असल्याचं सांगितलं. सर्व बनावट संवादांवर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी गेल्या चार वर्षांत सतत रक्कम भरली. गेल्या चार वर्षांपासून फिर्यादी यांनी आरोपींच्या विविध खात्यांवर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा सगळा प्रकार बनाव असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आता पोलिसांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केला असून पुढील तपास सुरू आहे
