वारंवार शारीरिक संबंध अन् गर्भपाताच्या गोळ्या, उद्योगपतीवरील आरोपाने बारामतीत खळबळ

बारामती : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्य सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर बारामतीच्या एका उद्योगपतीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने पीडितेचे शोषण केल्याचा आरोप आहे.
पीडित तरुणीने २०२० मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे येथे अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये तिची बारामती येथे आरोपी मनोज कुंडलिक तुपे याच्याशी ओळख झाली.

तुपेने स्वतःची ओळख मोठा उद्योगपती अशी करून देत, तिला व तिच्या मैत्रिणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले आणि तिचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर दोघांमध्ये सातत्याने फोनवरून बोलणे सुरू झाले.
दरम्यान, मे २०२१ मध्ये पीडिता पुण्यात अभ्यासासाठी राहायला आली. ऑगस्ट २०२१ मध्ये, आरोपी तुपेने तिला जेवणासाठी बोलावले आणि हडपसरला सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. गाडीतळाजवळ आल्यावर त्याने गाडीतच तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
हा प्रकार २०२१ पासून १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहिला. यानंतरही आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील विविध हॉटेल्समध्ये नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केला.