कोल्हापुरात संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?आधी दुचाकी, नंतर जंगलात जळालेल्या अस्थी, माजी सरपंचांसोबत नेमकं काय घडलं?

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावमध्ये झाली आहे. माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता असून जंगलात दुचाकी आणि जळालेल्या अस्थी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तपासात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे बीड मधील देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती झाली का अशी भीती व्यक्त होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर 7 जानेवारी 2026 रोजी ते रात्री जेवणासाठी बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर पिळणकर अद्याप घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. तपासा दरम्यान पाटगाव गावातच त्यांचे वाहन आढळले तर काही अंतरावर झालेल्या अवस्थेत काही असती आढळल्या. यास्ती अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत मात्र याचाही अहवाल अद्याप मिळाला नाही.
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून 100 हून अधिक जणांची चौकशी केली आहे. महेश पिळणकर हे नक्की कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक वैमनस्यातून त्यांच्यासोबत काही गैरप्रकार घडला आहे का, यादृष्टीने तपास सुरू आहे.

पिळणकर हे व्यवसायाने काजू उत्पादक आणि हर्बल व्यापारी असल्याने त्या क्षेत्रातील वादाचीही पडताळणी केली जात आहे. आज झालेल्या आंदोलनात महेश पिळणकर यांच्या पत्नी आणि कुटुंबयांनी “महेश पिळणकर यांचं झालं तरी काय?” असा सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तसेच या प्रकरणात तपास गतिमान करावा अशी विनंती केली आहे.
पोलिसांना देखील या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. दरम्यान तपासात सापडलेले अवशेष मानवी आहेत की प्राण्यांचे, याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे तपासाची दिशा स्पष्ट झालेली नाही.