पीएमआरडीए हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेची तफावत दूर करा, आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी ….

उरुळी कांचन : पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये पुणे महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील गावांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत लाभार्थ्यांना वितरीत होणाऱ्या अनुदानातील तफावत, तसेच गावठाण आणि गावठाण बाहेरील निधीवाटपातील विषमता या महत्त्वपूर्ण विषयावर आमदार राहुल कुल यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले कि, गावठाण हद्दीबाहेरील लाभार्थ्यांना २.५० लाख अनुदान, तर गावठाणातील लाभार्थ्यांना केवळ १.२० लाख अनुदान दिले जाते. हा फरक अन्यायकारक असून, एकाच गावातील नागरिकांना भिन्न अनुदान दिले जाण्याचे निकष स्पष्ट करणे आवश्यक आहे.

संविधानाच्या अनुच्छेद १४ नुसार सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार आहे. तरी सरकारी योजनेत असे भेदभाव होत आहेत त्यामुळे यामध्ये बदल करून, PMRDA हद्दीतील सर्व लाभार्थ्यांना समान अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. योग्य ती सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे.
