महाशिवरात्री निमित्त लोणी काळभोर परिसरातील भगवान शंकराच्या विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

लोणी काळभोर : आज महाशिवरात्री निमित्त लोणी काळभोर परिसरातील भगवान शंकराच्या विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविक भक्तांनी भगवान शंकराच्या सर्वच मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत डोंगराच्या कुशीत वसलेल्या तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे आज पहाटे ४ वाजता “श्री” ना महामस्तकाभिषेक करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे उपस्थित भाविकांना साबुदाणा खिचडी व शेंगदाण्याच्या आमटीचा प्रसाद देण्यात आला.
रामदरा तिर्थक्षेत्राचे जनक स्वर्गीय धुंदीबाबा ऊर्फ देवीपुरीमहाराज यांनी स्वहस्ते घडवलेल्या बारा ज्योतिर्लिगांचा अंश असलेेल्या दुर्मिळ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर हजारो भाविकांनी पहाटेेेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. यांत पुणे, पिंपरी -चिंचवडसह परप्रांतातून आलेल्या भाविक व पर्यटकांचा समावेश होता.

लोणी काळभोर गावातील प्राचीन शिवालय व अंचलेश्वर मंदिरातही आज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पहाटे ३ वाजता महाअभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. या ठिकाणीही दर्शनासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत प्रचंड प्रमाणात गर्दी उसळली होती.
पुुणे – सोलापूर महामार्गावरील बोरकर वस्ती येथील बारवेश्वर शिवालय मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पहाटे चार ते सहा दरम्यान श्रीं ना आभिषेक घालून महापुजा करण्यात आली. सकाळी सात ते आठ दरम्यान काकड आरती पार पडली. त्या नंतर थेऊर फाटा ते बोरकर वस्ती दरम्यान पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
दिवसभर शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले. या वेळी महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती. दुपारी चार ते सहा दरम्यान शिवसहस्त्र नामावली पठण करण्यात आले. सायंकाळी सात ते रात्री दहा दरम्यान परिसरातील सर्व भजनी मंडळांचे भजन पार पडले. या दरम्यान फराळाचा प्रसाद दिवसभर सुरू होता.
लोणी काळभोर – आळंदी म्हातोबाची शिवेवरील डोंगरमाथ्यावर असलेल्या श्री गवळेश्वर महादेव मंदीर परिसरात श्री गवळेश्वर सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये अभिषेक, शिवलिलामृत वाचन, भजन, हरिपाठ, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता.