शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी! आता दहा दिवसांत दूध बिल मिळणार…

पुणे : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून शेतकर्यांना दुधाचे बिल १५ ते २० दिवसांत दिले जात असत. ते आता १० दिवसांत देण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये संघास दूधपुरवठा करणार्या शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. अशी माहिती संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्निल ढमढेरे यांनी दिली.

संघाच्या डेअरी विस्तारीकरणाच्या मंजूर नवीन अद्ययावत प्रकल्पास गती देऊन त्याची उभारणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. संघाच्या मुख्यालय प्रांगणात दि. १५ ऑगस्ट रोजी ढमढेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी संघाच्या संचालिका लता गोपाळे, संचालक चंद्रकांत भिंगारे, व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये, संघाचे अधिकारी, कर्मचारी, माजी अधिकारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कात्रज दूध संघाच्या पशुखाद्य कारखान्यातील उत्पादित पशुखाद्याची विक्री दरमहा 350 मेट्रिक टनावरून आता सुमारे 450 मे. टन इतकी विक्रमी वाढल्याचे नमूद करून ते म्हणाले की, संघामध्ये संकलित होत असलेल्या दुधाची गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याकरिता कायमस्वरूपी फिरते पथक (स्क्वॉड टीम) कार्यान्वित करण्यात आले आहे. जे जिल्ह्यातील प्रत्येक दूध संस्था, बल्क कुलर तसेच दूध शीतकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन दुधाच्या गुणवत्तेत सुधारणेसाठी नियोजन करेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार मारणे यांनी केले आहे.
