लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरण अपडेट ; तोतया IAS ‘कल्पना’ दिल्लीत ,धक्कादायक माहिती समोर

दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी कारचा भीषण स्फ़ोट झाला. या कार प्रकरणाबाबत आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.या काळात छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलेली तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत ही देखील दिल्लीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलेली तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना हिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया व बांगलादेशच्या व्यक्तींची नावे आणि फोन नंबर आढळले आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे केंद्रीय गुप्तचर खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.रविवारपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कल्पनाची सध्या सिडको पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा, एटीएसकडून चौकशी सुरू आहे.
दरम्यान कल्पनाच्या मोबाइलमध्ये अनेक मोबाइल क्रमांकांसोबत केंद्रीय गृहमंत्र्यांचे ओएसडी म्हणून अभिषेक चौधरी नावाने नंबर सेव्ह आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याची माहिती काढली जात होती. दिल्लीकडून प्राप्त माहितीनुसार, सदर व्यक्तीने मंत्र्यांच्या ओएसडीच्या नावाचा वापर करून त्यानेही अधिकारी असल्याचा बनाव रचल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कल्पना व अशा अनेक तोतया अधिकाऱ्यांचे सिंडिकेटच ऑपरेट होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.बॉम्बस्फोटाच्या दरम्यानच कल्पनाचे दिल्लीतील वास्तव्य योगायोग होता की आणखी काही, या दिशेने दिल्लीस्थित गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत. याबाबत आता आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

