Paytm, Google Pay, PhonePe युजर्ससाठी मोठा अलर्ट; RBIने बदलले व्यवहाराचे नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : डिजिटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम जाहीर केले असून हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत.

डिजिटल व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत असताना फसवणूक आणि हॅकिंगच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने Reserve Bank of Indiaने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या बहुतांश लोक UPI, डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग तसेच डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून व्यवहार करत असल्यामुळे ऑनलाइन सुरक्षेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
अनेक वेळा केवळ ओटीपी टाकून व्यवहार पूर्ण केला जातो. मात्र, नव्या नियमांनुसार केवळ ओटीपी पुरेसा ठरणार नाही. Reserve Bank of Indiaच्या या नव्या नियमानुसार आता प्रत्येक ऑनलाइन व्यवहारासाठी दोन स्तरांची पडताळणी (टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन) अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होणार असून फसवणुकीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे.

नवीन नियमांनुसार, प्रत्येक ऑनलाइन व्यवहारासाठी किमान दोन वेगवेगळ्या पडताळणी पद्धतींचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. Reserve Bank of Indiaच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या पद्धतींमध्ये मोबाइल पिन, UPI पिन, पासवर्ड, बायोमेट्रिक, फिंगरप्रिंट किंवा डायनॅमिक ओटीपी यांचा समावेश असू शकतो. यापैकी किमान एक पडताळणी पद्धत डायनॅमिक (वेळेनुसार बदलणारी) असणे बंधनकारक असणार आहे, ज्यामुळे व्यवहारांची सुरक्षा अधिक मजबूत होईल.
तसेच व्यवहाराच्या रकमेप्रमाणे पडताळणीची पातळी ठरवली जाईल. लहान रकमेच्या नियमित व्यवहारांसाठी कमी पडताळणी लागू शकते, तर मोठ्या किंवा संशयास्पद व्यवहारांसाठी अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जाईल. या पद्धतीला रिस्क-बेस्ड ऑथेंटिकेशन असे म्हटले जाते.
आरबीआयच्या मते, देशात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र त्याच वेळी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग आणि हॅकिंगच्या घटनाही वाढत आहेत. जुना एसएमएस ओटीपी अनेकदा सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे, कारण हॅकर्स तो सहज मिळवू शकतात.
नवीन नियमांमुळे फिशिंग, अनधिकृत व्यवहार आणि ऑनलाइन फसवणूक कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, जर एखाद्या व्यवहारात फसवणूक झाली आणि बँक किंवा पेमेंट कंपनीने सुरक्षा नियमांचे पालन केले नसेल, तर ग्राहकाला नुकसान सहन करावे लागणार नाही. अशा परिस्थितीत संबंधित बँकेला किंवा कंपनीला संपूर्ण रक्कम परत करावी लागेल.
या बदलांमुळे बँका तसेच पेटीएम, गूगल पे आणि फोनपे यांसारख्या डिजिटल पेमेंट कंपन्यांना त्यांच्या प्रणाली अपडेट कराव्या लागतील. व्यवहारांवर अधिक लक्ष ठेवणे आणि नवीन सुरक्षा प्रणाली लागू करणे त्यांच्यासाठी अनिवार्य असेल.
दरम्यान, ग्राहकांनीही आपले बँक किंवा यूपीआय ॲप वेळोवेळी अपडेट ठेवावे. तसेच बायोमेट्रिक सुविधा सक्रिय करणे, पिन किंवा ओटीपी कोणालाही न सांगणे आणि संशयास्पद लिंक्सवर क्लिक न करणे यांसारख्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या सर्व उपायांमुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.