Rashmi Barve : राज्यात काँग्रेसला मोठा झटका! लोकसभा उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द, झाली मोठी अडचण…

Rashmi Barve : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
जात पडताळणी समितीने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. शिवसेनेचा विद्यमान खासदार असतानाही मविआत काँग्रेसने रामटेकच्या जागेवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.
परंतु रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल (ता.२७) संपली. त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्रावर जात पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, रश्मी बर्वेंच्या एबी फाॅर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या पतीचं नाव देण्यात आलं होतं. रश्मी बर्वेंचं प्रमाणपत्र रद्द झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून श्यामकुमार बर्वे यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यामुळे आता श्यामकुमार बर्वे हे रामटेकमधून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. Rashmi Barve
रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेकचे विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापत काँग्रेसमधून आलेले आमदार राजू पारवे यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे श्रीयुत पारवे विरुद्ध श्रीयुत बर्वे असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.