पुणेकरांनो मोठी खुशखबर! नव्या आर्थिक वर्षात पगारात झपाट्याने वाढ; टॅक्समध्येही मोठा दिलासा…


पुणे : पुण्यात राहून नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या प्राप्तिकर नियमांतील बदलांमुळे त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बदलाचा सर्वाधिक फायदा घरभाडे भत्ता (HRA) घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना अधिक करसवलत मिळणार असून, त्यामुळे त्यांच्या आर्थिक भारात लक्षणीय दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यात आयटी, ऑटोमोबाईल आणि विविध सेवा क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या मोठ्या कर्मचारी वर्गासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांनाच मिळणाऱ्या काही करसवलतींचा लाभ आता पुण्यातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार असल्याने त्यांच्या मासिक बचतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राप्तिकर नियमांनुसार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्त्यावर ठराविक मर्यादेपर्यंत करसवलत दिली जाते. आतापर्यंत मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या शहरांना मेट्रोचा दर्जा देण्यात आला होता. या शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगाराच्या ५० टक्क्यांपर्यंत HRA वर करसवलत मिळत होती.

मात्र पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबादसारख्या शहरांमध्ये घरभाडे मोठ्या प्रमाणात वाढूनही येथे ही मर्यादा केवळ ४० टक्क्यांपर्यंत होती. आता १ एप्रिलपासून पुणे या विशेष श्रेणीत समाविष्ट होणार असल्याने येथील कर्मचाऱ्यांना बेसिक पगाराच्या ५० टक्क्यांपर्यंत HRA वर करसवलत मिळण्याची शक्यता आहे.

करतज्ज्ञांच्या मते, या बदलामुळे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. HRA वरील वाढीव सवलतीमुळे करपात्र उत्पन्न कमी होईल आणि परिणामी दरमहा हातात येणाऱ्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

अंदाजानुसार, काही कर्मचाऱ्यांना वर्षभरात सुमारे ६० हजार ते १.२० लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते. त्यामुळे पगारातून कापला जाणारा कर कमी होऊन बचत वाढण्यास मदत होईल. विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या बदलाचा अधिक लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र हा फायदा सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. ही सवलत केवळ जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे. नवीन करप्रणाली स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांना HRA वरील करसवलतीचा लाभ मिळत नाही.

त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे घरभाडे जास्त आहे आणि जे जुन्या करप्रणालीत राहतात, त्यांनाच या बदलाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. तर कमी उत्पन्न असलेल्या किंवा कमी भाडे देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन करप्रणाली तुलनेने अधिक फायदेशीर ठरू शकते.

या सवलतीचा लाभ घेताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कर्मचारी जर आपल्या पालकांना किंवा नातेवाईकांना भाडे देत असतील, तर त्यासंबंधित योग्य पुरावे ठेवणे बंधनकारक असेल.

तसेच घरमालकाचा पॅन क्रमांक आणि भाड्याच्या पावत्या सादर करणेही आवश्यक राहणार असून, नियमांनुसार कागदपत्रे पूर्ण केल्यासच या करसवलतीचा लाभ मिळू शकणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!