रणजितसिंह नाईक निंबाळकर,जयकुमार गोरेंंना रामराजे कंटाळले ! अजित पवार यांच्या भविष्याचा निर्णय घेऊन निर्णय घेतला ; वेगळा निर्णय घ्यावा लागेल….
फलटण : हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात दंड थोपटणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरही आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
रामराजे नाईक निंबाळकर फलटण तालुक्याच्या एका कार्यक्रमात म्हणाले की, मी शरद पवारांना देव मानतो. तेवढंच अजितदादांनाही मानतो. अजितदादांमधील गुण आणि भविष्याचा विचार करून आपण निर्णय घेतला, परंतु माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे, तर आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंद जोपर्यंत सुरक्षित राहत नाही, तोपर्यंत आपलं महायुतीशी जमणार नाही.
पुढे बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, दिल्लीत एक भारतीय जनता पार्टी आणि साताऱ्यात एक नवीनच भारतीय जनता पार्टी आहे. त्या पार्टीचं पिल्लू ज्याची माणमध्ये एक शाखा आणि फलटणमध्ये दुसरी शाखा आहे. त्यांना जोपर्यंत ताकद मिळतेय, तोपर्यंत आम्ही अजितदादांना प्रश्न विचारणारच, यावेळी त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माण विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली.
पुढे बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, फलटण तालुक्याचे सलग चौथ्यांदा दिपक चव्हाण हे आमदार व्हायला निघाले आहेत. त्यांना आपण पुन्हा निवडून द्यायचंय. फलटणमध्ये कुणीही चौथ्यांदा निवडून आले नाही. पण यंदा दिपक चव्हाण यांच्यामागे आपल्याला ताकदीने उभा राहायचे आहे. दिपक चव्हाण तुम्हाला बोलताना, वागताना विचार करुन, जबाबदारीनं वागावं लागेल. आमच्या घराण्याचं राजकीय कल्चरही सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. आतापर्यंत तुम्ही व्यवस्थित सगळे पार पाडलं, आताही पाडाल, अशी अपेक्षाही रामराजेंनी व्यक्त केली.