राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार; मविआकडून शरद पवार यांना उमेदवारी, काँग्रेस, ठाकरे गटाचा पाठिंबा..


मुंबई : महाविकास आघाडीने अखेर राज्यसभेच्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे पवारांच्या नावाला समर्थन दिल्यानंतर, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले.

यामुळे महाविकास आघाडीतील सस्पेन्स संपुष्टात आला आहे. शरद पवार यांच्या उमेदवारी अर्जावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. सुप्रिया सुळेंसोबतच संजय राऊत, जयंत पाटील, भास्कर जाधव, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, आदित्य ठाकरे हे अर्ज दाखल करताना गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे, महायुतीमधील भाजपनेही राज्यसभेसाठी आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते आणि धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांचा समावेश आहे.

भाजपने माया इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या माध्यमातून नवे चेहरे देऊन सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातून सात जागांसाठी होणारी ही निवडणूक महाविकास आघाडीकडून एक आणि महायुतीकडून सहा उमेदवार असल्याने बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात रोहित टिळक यांना रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत थेट पवार विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!