निवडणूक आयोगाविरुद्ध राज ठाकरेंची मोठी खेळी, महानगरपालिका निवडणुकीत चमत्कार घडणार?

मुंबई : तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सतत निवडणूक आयोगाच्या कामाकाजावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे आणि काम व्यवस्थित होत नाही असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

आता याच मुद्द्यावरून आवाज उठवण्यासाठी मनसेने येत्या १ नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चा आयोजित केला आहे. आज या मोर्चाच्या अनुषंगाने एक बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या मोर्चासाठी आतापासूनच जोरदार तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्व पद्धतीने करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. हा मोर्चा इतका मोठा असावा की त्याची दखल दिल्लीपर्यंत पोहोचावी.

येत्या १ नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चामध्ये सामान्य मतदारांना घेऊन या, जेणेकरून निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांचा किती राग आहे, हे दिसून येईल. तसेच निवडणूक आयोगाचा भोंगळ आणि गैरकारभार किती आहे, याची संपूर्ण माहिती तरुणांना द्या. सर्व माहिती पारदर्शकपणे त्यांच्यासमोर मांडा, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कार्यपद्धतीची माहिती देणारे आकर्षक प्रेझेंटेशन तयार करा आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बस किंवा ट्रेन मधून प्रवास करताना लोकांशी या विषयावर उघडपणे बोलावे आणि त्यांच्याशी संवाद साधावा.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोगाच्या ज्या चुका आहेत, मतदार यादीतील घोळ आहे आणि राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा जो अनुभव आहे, त्याबद्दलचे ठोस पुरावे गोळा करा आणि ते लोकांसमोर मांडा, अशीही सूचना राज ठाकरेंनी दिली आहे.
