नाशिकमध्ये वृक्षतोडीला राज ठाकरे यांचा विरोध, महत्वाच्या मुद्याला हात घालत सरकारला दिला थेट इशारा…


नाशिक : येथील आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला.

त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता.

आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ? बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा.

सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो. आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत !

       

नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच ! असेही राज ठाकरे यांनी म्हटले असून हा वाद पेटला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!