राज ठाकरेंना धक्का ; ‘या’ कट्टर समर्थकांच्या हाती कमळ, वीस वर्षाची साथ सोडल्यानंतर पक्षावर आरोप..

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेंची कट्टर समर्थक आणि मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.ऐन निवडणुकीत त्यांनी कमळ हाती घेतल्याने शहराच्या राजकीय समीकरणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या दोन दशकांपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून मनोज घरत यांची ओळख आहे. मात्र गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा संघर्ष सुरू आहे. या पॅनल मधील गोंधळ आणि ठाकरेंच्या संघर्षामुळे नाराज होऊन त्यांनी राज ठाकरेंची वीस वर्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मनोज घरत यांनी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यानंतर बोलताना त्यांनी अनेक आरोप केले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वर्षांच्या आदेश पाळलेच नाहीत.पॅनलची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. एकाच पॅनलमध्ये मनसे आणि उबाठा या दोघांचेही उमेदवार रिंगणात उतरले होते. अशा परिस्थितीत ठाकरे ब्रँड लोकांसमोर कसा न्यायचा, हा प्रश्न आमच्यासमोर होता, असे मनोज घरत यांनी म्हटले आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, मी मनसे सोडून भाजपमध्ये तिकीटासाठी आलेलो नाही. मनससोबत २० वर्षांचा प्रवास होता. त्यामुळे जड अंतकरणाने हा निर्णय घेतला. पण कार्यकर्त्यांच्या भावना आणि भविष्यातील कामाचा विचार करणे आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले. अखेर त्यांनी मनसेला रामराम करून कमळ हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
