उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरेंनी मौन सोडलं, ‘’काल त्यांना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना….’’

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या भेटीवर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही भेट राजकीय नव्हती,काही चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील, तर भेट घेतलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये असं त्यांनी स्पष्ट म्हटलं.

राज ठाकरे यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे हे सत्तेत आहेत. आम्हाला जर काही सांगायचे असेल, काही चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील, तर भेट घेतलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची गरज नाही. शहरातील विविध समस्या आणि प्रश्नावर आमच्या भेटीत चर्चा झाली.आपल्याकडे चांगले रस्ते, फ्लायओव्हर्स व्हावेत चांगली गोष्ट आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते आहे. त्याचा लोकांना किती त्रास होत आहे.अनेक इमारतींमध्ये पार्किंगचा मोठा मुद्दा आहे, अशा अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकांच्या प्रश्नासाठी आपण काल भेटलो, उद्या त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटू असेही त्यांनी सांगितले
