राज्यात पावसाची पुन्हा हुलकावणी, आता नवीन अंदाज आला समोर; ‘या’ दिवशी होणार दमदार आगमन

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. आता हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
त्यानुसार राज्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली आहे. मागील अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने अखेर राज्यात बरसण्यास सुरुवात केली आहे. परंतु हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजावरून शेतकऱ्यांसह सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाला पोषक अशी स्थिती तयार होणार नसल्याने पुढील तीन दिवस पाऊस लांबणीवर पडणार आहे.
२५ ऑगस्टपासून कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढू शकतो. शेतकऱ्यांसह सर्वजण पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहेत.
तसेच या महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे पुढील महिन्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण कोकणासह विदर्भात पावसाचा जोर वाढेल. राज्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.