शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत! राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज..
पुणे : राज्यभरात दडी मारलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात येत्या २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे प्रदीर्घ विश्रांतीनंतर येत्या पाच ते सात दिवस पुणे परिसरात पुन्हा एकदा पावसाची बॅटिंग पाहायला मिळेल. पुणे घाट विभागामध्ये दोन दिवस यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
तसेच नाशिक, सातारा जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर विदर्भ, मराठवाड्यात आजपासून तर राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीलगत आजपासून पावसाचा जोर देखील वाढणार आहे.
भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातदेखील दोन दिवस पावसाचा जोर वाढू शकतो. कोकण किनारपट्टीलगत पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळणार आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाच्या दमदार हजेरीने राज्यावरचे दुष्काळाचे सावट टळू शकते. या महिन्यात ९१ ते १०९ टक्के पाऊस पडू शकतो. त्याशिवाय आता या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत देखील वाढ होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.