राज्यात मुंबईसह अनेक भागांत पावसाचा इशारा, नाशिकला गारांनी झोडपलं, कांद्याचे मोठं नुकसान..

मुंबई : सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या काही तासांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही जारी केला आहे. तर मुंबईत आज आणि उद्या पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नाशिकच्या येवल्यात काल सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील राजापूर, पन्हाळसाठे या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढून ठेवलेला कांदा यात मोठ्या प्रमाणात भिजला आहे. कांदा काढणी चालू असल्याने शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे एकच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
पुढील दोन दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. परिणामी बदलत्या वातावरणामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
उष्णतेपासून दिलासा देणारा पाऊस कधी बरसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, राज्यात सध्या उन्हाचा जोर कायम असून उष्णतेचा चटका नागरिकांना बसत आहे. मात्र दुसरीकडे, पावसालाही पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अकोल्यात पारा 44 अंशांवर गेल्याने अकोलेकर घरात बसून कुलरच्या थंडीचा सहारा घेत आहेत. याठिकाणी विक्रमी तापमानापुढे देवालासुद्धा कुलरचा आसरा घ्यावा लागत आहे. अकोल्याच्या मंदिरांमध्ये देवाच्या मुर्त्याना थंडावा देण्यासाठी विशेष सोय करावी लागती आहे.