नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी! १ जानेवारीलाच ‘या’ जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सतर्कतेचा इशारा…

पुणे : नवीन वर्ष 2026 मध्ये पाऊल टाकताच मुंबईकरांना अनपेक्षित सरप्राईज मिळालं आहे. राज्यभरात हिवाळ्याचा जोर वाढलेला असताना मुंबईतील काही भागांमध्ये पहाटेपासूनच पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली असून, थंडीच्या वातावरणात पावसाची भर पडल्याने गारवा अधिक जाणवत आहे. एकीकडे महाराष्ट्रातील अनेक भागांत किमान तापमान मोठ्या प्रमाणात घसरलेले असताना, दुसरीकडे मुंबईत पावसाची हजेरी ही हवामानातील बदलांची स्पष्ट झलक दाखवत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये थंडीचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले असून, अधिकृतरीत्या थंडीची लाट जाहीर करण्यात आली नसली तरी गारठा प्रकर्षाने जाणवत आहे.

सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत थंडी अधिक तीव्र होत असून, दुपारच्या सुमारास मात्र उन्हाचा चटका जाणवत असल्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक दिसून येत आहे.
मुंबई, कोकण आणि इतर किनारी भागांमध्ये रात्री व पहाटे थंड वारे वाहत असून, वातावरणात थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, मुंबईत काही भागांमध्ये पहाटेपासून पावसाच्या सरी पडत असल्याने वातावरण अधिक गार झाले आहे. थंड वारे, ढगाळ आकाश आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे मुंबईतील नागरिकांना हिवाळ्यासोबतच पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे.
दुपारच्या सुमारास मात्र सूर्यप्रकाश वाढत असल्याने तापमानात वाढ होते आणि उष्णता जाणवते. यामुळे दिवसा उष्णता आणि रात्री थंडी असा विरोधाभास दिसून येत आहे. हवामानातील या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असून, सर्दी, खोकला आणि तापासारख्या तक्रारी वाढू शकतात.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील विविध भागांमध्ये पुढील चार दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजे 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे किमान तापमान 7 अंशांपर्यंत घसरले असून, अहिल्यानगरमध्ये 7.5 आणि निफाडमध्ये 7.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.
