विदर्भ, मराठवाड्यात पाऊस; पुण्यात उन्हाच्या झळ्या! तापमानात वाढ होण्याची शक्यता
पुणे : विदर्भ, मराठवाड्यातील गेल्या चार दिवसांपासून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील किमान व कमाल तापमानात वाढ होत असल्याने पुणेकरांना उन्हाच्या झळ्या झोंबू लागल्या आहेत. दोन दिवसांनंतर कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या विदर्भ परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. परिणामी, मराठवाडा, विदर्भात पाऊस झाला. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
तसेच बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, मराठवाड्यामधील हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूरमध्ये अनेक भागांमध्ये हलक्या सरी कोसळतील.
राज्यातील सर्वाधिक तापमान वाशिमला ३८.६, तर सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात १६.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात गारवा असल्याने उष्णता खूप जाणवत नव्हती. परंतु, सोमवारपासून मात्र गारवा कमी होत असून, उष्णतेमध्ये वाढ होऊ लागली आहे. किमान तापमानदेखील आता शिवाजीनगरचे १६.१ अंश सेल्सिअसवर गेले आहे, तर वडगावशेरी, मगरपट्टा, हडपसर या ठिकाणचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले आहे.
राज्यातील कमाल व किमान तापमान
पुणे – ३५.८ – १६.१
जळगाव – ३६.७ – १८.६
सोलापूर – ३८.४ – २२.६
वाशिम – ३८.६ – १८.६
नागपूर – ३२.६ – २२.१
मुंबई – ३२.२ – २३.०
सातारा – ३६.० – १९.०
अकोला – ३७.३ – २०.२